Articles

महाकारणदेह

महाकारणदेहात प्रवेश झाल्यानंतर साधक सिद्ध होतो, ईश्वराशी एकरूप होऊन जातो. ईश्वराप्रमाणे तो सर्वज्ञ व चराचरात भरलेला असतो.

ज्याप्रमाणे काचेच्या ग्लासातील पाणी समुद्रात ओतल्यानंतर, समुद्राशी एकरूप होऊन समुद्रच होते, त्याप्रमाणे महाकारणदेह हा विश्वव्यापी परमेश्वराशी किंवा Cosmic Energy शी किंवा Supreme Absolute शी एकरूप झालेला असतो. साधकाचा आध्यात्मिक प्रवास इथे संपतो.

जगातील सारे सिद्धपुरुष एकच असतात कारण ते महाकारणदेहाशी किंवा परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. अमेरिकेत राहणारा सिद्धपुरुष इज्रायलमध्ये राहणाऱ्या सिद्धपुरुषाला ओळखत असतो व इज्रायलमध्ये राहणारा सिद्धपुरुष, अमेरिकेत, पॅलेस्टाइन, इराक, इराणमध्ये राहणाऱ्या सिद्धपुरुषाला ओळखत असतो, कारण सारे सिद्धपुरुष एकच असतात. त्यांच्यात कुठलेही भेदभाव नसतात. धर्माच्या नावाने भेदभाव फक्त अज्ञानी लोक करतात. विशेष म्हणजे हे सारे सिद्धपुरुष श्वासाचीच साधना करत असतात.

मानवी देह पंचमहाभूताने बनलेला असल्याने एक-एक element वर विजय प्राप्त करत साधक जेव्हा वायू तत्त्वापर्यंत पोहोचतो तेव्हा सारे साधक वायू तत्त्वाचीच साधना करू लागतात. अक्षराच्या साधना म्हणजे स्तोत्र व मंत्रांच्या उपासना, तेज तत्त्वापर्यंत चालतात. वायू तत्त्वामध्ये प्रवेश केल्यानंतर, वायू तत्त्वाची साधना म्हणजे नाद साधना सुरू होते. नाद साधना म्हणजे श्वास आत घेताना व बाहेर सोडताना जो ध्वनि निर्माण होतो, त्या ध्वनिची साधना.

नाद साधना

नाद साधना सुरू झाल्यानंतर श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना त्यावर लक्ष केंद्रीत करून तो नाद ऐकावयाचा असतो. कालांतराने तो नाद आपोआप साधकाच्या उजव्या कानात येऊ लागतो. साधकाने त्यावर लक्ष केंद्रीत केल्यावर एक-एक तत्त्वावर विजय प्राप्त होऊ लागतो. हळूहळू साधक वायू तत्त्वात पोहोचतो. यावेळी अनेक प्रकारचे नाद ऐकू येतात. कालांतराने सारे ध्वनि आकाशात विलीन होतात व साधक महाकारणदेहाशी एकरूप होतो. परमेश्वराशी एकरूप होतो. जगातील सर्व सिद्धपुरुषांशी एकरूप होतो.