Articles

महायोग्यांच्या कथा

योगीराजांनी माझ्या सर्व जिज्ञासा शांत केल्या, ते जे ज्ञान सांगत ते मी आमच्या विश्रांतीच्या वेळेस लिहून काढत असे व त्यांना ते सर्व वाचून दाखवत असे. लिखाणात झालेल्या थोड्याफार चुका ते स्वतः दुरुस्त करत व नंतर पुढे ज्ञान सांगायला सुरुवात करत.

नेहमीप्रमाणे मी त्यांच्या समोर बसले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

आतापर्यंत मी तुला जे काही ज्ञान दिले, ते ज्ञान तू जेव्हा लोकांना देण्याचा प्रयत्न करशील तेव्हा काही लोक, तुला असाही प्रश्न विचारतील की हे ज्ञान खरे आहे कशावरून. यासाठी तुला काही सत्यकथा मी सांगून ठेवतो. त्यावरून सर्वाच्या लक्षात येईल की आध्यात्मात प्रगती केल्यानंतर सर्व सिद्धपुरुष एकच असतात, ते कुठल्याच धर्माचे नसतात, ते फक्त ईश्वराचे असतात.

यापूर्वी मी तुला सांगितले आहे, पाण्यामध्ये तरंगणाऱ्या बर्फाचे शेवटी पाणीच होते, त्याचे स्वतंत्र अस्तित्व राहात नाही. त्याप्रमाणे आपला महाकारणदेह हा Supreme Absolute रुपी परमेश्वरामध्ये तरंगत असतो. जेव्हा आपल्यातील अहंकार समूळ नष्ट होतो, सूक्ष्मदेह व कारणदेह हेही नष्ट होतात, तेव्हा आपली जाणीव महाकारणदेहाशी एकरुप होते. आपल्यापैकी जो कोणी ही साधना करतो, त्याला योगी किंवा साधक म्हटले जाते.

साधक अथवा योगी सूक्ष्मशरीरातील लाखो प्रवृत्तींवर विजय प्राप्त करतो. स्थूलदेहाला शिस्त लावून नियंत्रित करतो. ईश्वराशी एकरूप होण्याची अभिलाषा धरून सूक्ष्मदेहातील साऱ्या प्रवृत्ती नष्ट करतो व सूक्ष्मदेहाला कारणदेहात विलीन करतो. कारणदेहाला महाकारणदेहात विलीन करतो. महाकारणदेहामध्ये त्याची जाणीव विलीन झाल्यानंतर, ‘मी ईश्वर आहे’, ‘मी विश्वव्यापी आहे’, हा भाव त्याच्यात निर्माण होतो. काही काळ निर्विकल्प समाधीत राहिल्यानंतर त्याची संपूर्ण जाणीव Supreme Absolute मध्ये (परमशून्यामध्ये) विलीन होते. तो सर्व विश्वाशी एकरुप होतो व जगातील सर्व सिद्धपुरुषांशीही तो एकरुप होऊन जातो. असे महायोगी, महासिद्ध, आम्ही सारे एकच आहोत असे आपल्या भक्तांना सिद्ध करून दाखवतात व धर्मा-धर्मातील भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा महायोग्यांच्या काही कथा मी तुला सांगत आहे. वादविवाद होऊ नये म्हणून काही सिद्धपुरुषांची/मोठ्या योग्यांची नावे मी सांगण्याचे टाळणार आहे.

अमेरिकेमध्ये एक महान योगी राहात होते. त्यांचे स्थूलशरीर हिंदू धर्मात जन्माला आल्या कारणाने सारे भक्त त्यांना हिंदू समजत. हिंदू, मुस्लीम, खिश्चन, पारसी आणि यहूदी, असे अनेक धर्माचे लोक त्यांचे भक्त होते.

एक अमेरिकन खिश्चन भक्त एकदा त्यांना म्हणाला, “कंपनीच्या कामासाठी मी उद्या Saudi Arabia ला जात आहे.”

यावर ते महान हिंदू योगी म्हणाले, “अरे, तेथे माझा एक सख्खा भाऊ राहात आहे, त्याला तू जरूर भेट” व एका महान मुस्लीम adept चे नाव सांगितले.

यावर तो अमेरिकन भक्त म्हणाला, “आपण हिंदू आहात तर Saudi Arabia मध्ये राहाणारे adept तुमचे सख्खे भाऊ कसे?”

यावर हिंदू योग्याने उत्तर दिले, “माणसाचा जन्म हा फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी झालेला असतो. ज्ञानी लोक धर्मा-धर्मामध्ये भेदभाव करत नाहीत.”

तो अमेरिकन भक्त Saudi Arabia ला गेला. तेथील आपले काम आटपून त्या मुस्लीम adept चा शोध घेतला.

मुस्लीम adept ने त्याचे प्रेमाने स्वागत व म्हणाले, “गेले दोन दिवस मी तुझी वाट पहात होतो. अमेरिकेत राहणारे हिंदू योगी व मी एकच आहोत.”

त्यानंतर त्याने अमेरिकन भक्ताला विचारले, “तुझा पुढचा program काय आहे.” त्यावर तो भक्त म्हणाला, “मी उद्या अमेरिकेला परत जाणार आहे.” तेव्हा ते महान मुस्लीम adept म्हणाले, “अरे ज्याप्रमाणे मी तुझी इथे वाट पहात होतो, त्याप्रमाणे, Jerusalem येथे एक यहूदी सिद्धपुरुष तुझी वाट पहात आहे. आम्ही सारे एकच आहोत.”

यावर अमेरिकन म्हणाला, “हे शक्यच नाही, माझे उद्याचे अमेरिकेचे तिकीट confirm झाले आहे.” यावर योग्याने काहीच उत्तर दिले नाही.

मुस्लीम adept चा निरोप घेऊन अमेरिकन आपल्या guest house वर आला. तेथे एक महत्त्वाचा telegram त्याची वाट पहात होता. अमेरिकन माणसाने telegram उघडून पाहिला, तेव्हा त्याला धक्का बसला.

Telegram मध्ये कंपनीने कळवले होते, “Jerusalem ला जाऊन कंपनीची कामे पूर्ण करावीत.”

अमेरिकन माणसाने मनात म्हटले, “सिद्धपुरुष फक्त एक दुसऱ्याशी एकरुप नसतात, तर सर्व विश्वाशी एकरुप असतात, असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे.”

दुसऱ्या दिवशी तो अमेरिकन Jerusalem ला गेला. आपली कंपनीची कामे पूर्ण केली.

Jerusalem ला, एक पवित्र भिंत आहे, त्या भिंतीचे दर्शन मुस्लीम, ख्रिश्चन व यहूदी या तिन्ही धर्माचे लोक घेतात, तेथे नतमस्तक होऊन प्रार्थना करतात. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर, तेथे हा अमेरिकन गेला व त्याने अतिशय श्रद्धेने येशूख्रिस्ताची प्रार्थना केली. आजूबाजूला शेकडो लोक प्रार्थना करत होते. प्रार्थना करताना अमेरिकन मनात विचार करत होता. येथे कोठेतरी मला एक यहूदी सिद्धपुरुष भेटणार आहे. त्यांना कसे शोधायचे.

माझ्या अमेरिकेच्या गुरुने Saudi Arabia च्या adept चे नाव तरी सांगितले होते. पण Saudi Arabia च्या गुरुंनी नाव वगैरे काहीच सांगितले नाही. फक्त Jerusalem मध्ये एक सिद्ध वाट पाहात आहे एवढेच सांगितले आहे.

त्याच्या मनात असे विचार चालत असताना, एक दोन bomb स्फोट झाले. सर्वत्र पळापळ सुरू झाली. त्या पवित्र भिंतीजवळ आता फक्त दोन माणसे राहिली. एक अमेरिकन भक्त व दूर अंतरावर एक म्हातारा गृहस्थ आरामात खोकत बसला होता.

अमेरिकन भक्ताला वाटले की या वृद्धाला नक्कीच adept चा पत्ता माहीत असेल, म्हणून तो त्या वृद्धाजवळ गेला. त्या वृद्धाने अमेरिकन माणसाला पाहून म्हणाले, “मी तुझीच वाट पाहात बसलो आहे.”

असे म्हणून त्याला आपल्याजवळ बसवून, त्याच्या हिंदू गुरुची व Saudi Arabia तील adept ची चौकशी केली. आम्ही तिघेही एकच आहोत असे सांगितले.

अशा प्रकारे तीन धर्मांच्या तीन सिद्धपुरुषांनी ‘अंतरंगाने आम्ही एकच आहोत हे सिद्ध केले.’

ही गोष्ट मी जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी कुठल्यातरी पुस्तकात वाचली होती.