याशिवाय काही शक्ती कायमच अदृश्यसृष्टीत रहात असतात. यातील काही शक्तींचे मुख (Head) प्राण्यांचे असते व मानेपासून खालचा भाग माणसाचा असतो अशा असंख्य शक्ती पृथ्वीतलावर आपआपले अधिकार गाजवत असतात. याउलट काही शक्ती अशा असतात ज्यांचे डोके माणसाचे असते व खालचा भाग प्राण्याचा असतो.
पृथ्वीतलावरील ९९% व्यवहार या शक्तींच्या आधारावरच चालतात. पृथ्वीवरील ९५% माणसे या शक्तींच्या आधीन येतात. या शक्ती आपल्या ताब्यातील माणसांना आध्यात्मिक प्रगती करू देत नाहीत. ईश्वराच्या दिशेने पुढे जाऊ देत नाहीत. निर्गुण निराकार अशा परमेश्वराचे ज्ञान देणारा, सन्मार्गाने नेणारा, आध्यात्मात प्रगती करून देणारा असा गुरु भेटू देत नाहीत व भेटला तर त्याच्याजवळ टिकू देत नाही. अशी माणसे कालान्तराने सत्पुरुषाची निंदा करत फिरतात अर्थात् सत्पुरुषाला याचे काहीच वाटत नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहेत हे त्याला माहीत असते.
अशाप्रकारे पूर्ण विश्वभर तामस शक्तींचे साम्राज्य पसरलेले असते व त्यामुळे विश्वामध्ये शांती प्रस्थापित होणे कठीण होते.
एखाद्या उच्च कोटीच्या सत्पुरुषाने समाजावर कितीही उपकार केले, कितीही प्रेम दिले तरीही वातावरणातील या शक्ती माणसाला खऱ्या सत्पुरुषापासून दूर नेल्याशिवाय रहात नाहीत.
अदृश्य सृष्टीतील अर्ध मानव-अर्ध पशु शक्तींच्या प्रान्तातून उत्क्रांती क्रमानुसार अनेक प्रकारचे प्राणी पृथ्वीतलावर मनुष्य रुपाने-स्त्री, पुरुष रुपाने जन्म घेतात. साहजिकच त्या प्राण्यातील प्रवृत्ती या माणसांमध्ये दिसून येतात.
ईश्वराची (God or Divine administration) अपेक्षा अशी असते की, मनुष्यरुपाने जन्माला आलेल्या या प्राण्यांनी (spirits) आध्यात्मिक उन्नती (spiritual progress) करावी. मानवतेमध्ये सामावणारे सर्व गुण आत्मसात करावेत. याउलट ज्या शक्तींच्या प्रांतातून तो पृथ्वीतलावर जन्माला आला आहे त्या शक्तींच्या प्रांतातील आत्म्यांना (spirits) तो पुन्हा आपल्यातच परत यावा असे वाटते. या रस्सीखेचीमध्ये पृथ्वीतलावरील माणसाची त्रेधातिरपीट उडते याशिवाय पोट भरण्यासाठी काय करायचे? आई, वडील, बायको, मुले, मित्रमंडळी यांना आनंदी ठेवण्यासाठी काय करायचे? असे असंख्य प्रश्न त्याला भेडसावत असतातच.
या सर्वातून मार्ग काढणे व आध्यात्मिक प्रगती करणे हीच खरीखुरी मानवाची परीक्षा असते.
आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मानवाने यथाशक्ती मानवतेचे (दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, परोपकार) आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मानवांनी मानवतेचे आचरण करावे हे शिकविण्यासाठी देवलोकातून सिद्ध महात्मे (Great higher spiritual souls) पृथ्वीलोकावर मनुष्य रुपाने पाठवले जातात. या सिद्ध महात्म्यांना (Great souls) प्रत्येक मनुष्य कुठल्या लोकातून पृथ्वीतलावर जन्माला आलेला आहे याचे ज्ञान असते. प्रत्येक माणसातील चांगल्या वाईट प्रवृत्तींचेही ज्ञान असते. असे असून सुद्धाही ते प्रत्येक मानवाला प्रेम देतात व त्याची आध्यात्मिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, व मनुष्य मात्र त्याच्यातील पशु प्रवृत्तीनेच वागत राहतो व स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतिमध्ये अडथळे निर्माण करतो. याशिवाय वातावरणातील दुष्ट शक्ती त्याला सिद्ध पुरुषापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात व यामध्ये त्या बऱ्याचवेळा यशस्वी होतातही.
अशाप्रकारे चांगल्या व वाईट शक्तींचे महायुद्ध युगानुयुगे अहोरात्र चालू असते.