Articles

शक्तींचे साम्राज्य – भाग १

शक्तींचे साम्राज्य

अदृश्यसृष्टीमध्ये कोट्यावधी प्रकारच्या शक्तींचे अस्तित्व असते. या शक्तींची मोजदाद आजतागायत कोणीही केलेली नाही. प्रामुख्याने या शक्तिंचे तीन भाग पडतात. सात्त्विक शक्ती, राजस शक्ती व तामस शक्ती.

सात्त्विक शक्ती

सात्त्विक शक्तींना शक्ती असे न म्हणता देवता असे म्हणतात. या देवता अत्यंत प्रकाशमान असतात. त्या साधकांना ज्ञान देतात मोक्षाचा मार्ग दाखवतात. आनंद, शांती, समाधान, प्रेम, वैश्विक प्रेम, दया, करुणा असे सद्गुण देतात. या शक्तींच्या साधना केल्याने मनुष्य ईश्वर स्वरुप बनतो. त्याच्या अंगी अद्भुत सामर्थ्य असते. परंतु तो लीन व नम्र असतो ईश्वराच्या इच्छेनुसारच वागतो. त्याच्या वागण्याचा गूढ अर्थ कोणालाही कळत नाही. प्रकाशमय मार्गाने जाणारे लोक शेवटी प्रकाशातच विलीन होतात. त्यांना जीवनमुक्ती प्राप्त होते.

राजस शक्ती

या शक्ती प्रसन्न झाल्या असता साधकांना कीर्ती, वैभव प्राप्त होते व नाराज झाल्या असता साधकावर अनेक प्रकारची संकटे येतात, म्हणून या शक्तींना अर्धदेवता (Demi Gods and Goddess) असे म्हणतात. या शक्ती ज्या व्यक्तीला शाप देतात व त्याचे नुकसान करतात, ईश्वरी नियमाप्रमाणे त्या व्यक्तीचा उद्धार करण्याची जबाबदारी या आत्म्यांवर येऊन पडते. या शक्ती फार प्रकाशमान नसतात व फार काळ्याही नसतात. काळ्या ढगाप्रमाणे या शक्ती दिसतात.

तामस शक्ती

विश्वातील ९५% व्यवहार या काळ्या शक्तीच करत असतात. माणसाच्या मन व बुद्धीवर या काळ्या शक्तींचेच स्वामीत्व चालत असते. निराशा, उदासपणा, विचारांचे वादळ, अशांती, क्रूरता, हिंसा, अहंकार, असूया, भांडण करण्याची वृत्ती, युद्ध, क्रोध, द्वेष, डॉमिनेशन, दीर्घद्वेष, कपटकारस्थाने, स्वार्थ, कंजूषपणा, लोभीपणा, अशा असंख्य प्रवृत्ती तामसशक्तींमुळे निर्माण होतात. पृथ्वीवरील अशांतीचे कारण तामस शक्ती हेच होय.

या तामस शक्ती चित्र विचित्र आकाराच्या असतात. यात Earth-bound पिशाच्चे येतात. पृथ्वीवरील दुष्ट माणसे मृत्यूनंतर अदृश्यसृष्टीत जातात व तेथून पृथ्वीवरील मानवांना त्रास देण्याचे काम करतात.