सुईच्या टोकापेक्षा दहा लाख पटीने सूक्ष्म असा आपला आत्मा (self) असतो. तो परमात्मास्वरुपच असतो. त्यावर ४ मुख्य आवरणे असतात. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण.
स्थूलदेहाविषयी सर्व जगाला माहिती आहे. कारण व महाकारण या दोन आवरणाविषयी यापूर्वीच सांगून झालेले आहे. सूक्ष्मदेहाविषयी थोडी अधिक माहिती सांगणे आवश्यक आहे.
सूक्ष्मदेहामध्ये पायाच्या तळव्यापासून गुडघ्यापर्यंत अतिशय भयंकर तामसी शक्तींची केंद्रे दडलेली असतात. यातील एकजरी केंद्र जागृत झाले तर विनाशक अशी वाईट शक्ती प्राप्त होते. लोकांचे वाईट करावे, जगाचे वाईट करावे अशी बुद्धी होऊ लागते. गुडघ्याच्या थोडे वरती तामसी शक्तीचा प्रान्त संपतो व राजसी शक्तींचा प्रान्त सुरू होतो. मांड्यांपासून नाभीपर्यंत राजसी शक्तींची केंद्रे आहेत व हृदयापासून ब्रह्मरंध्रापर्यंत सात्त्विक व प्रकाशमान शक्तींची केंद्रे आहेत.
पृथ्वीतत्त्वातील शक्ती
पायाच्या तळव्यापासून गुडघ्याच्या २ इंच वरच्या भागापर्यंत शक्तीची जी केंद्रे आहेत या केंद्रांना पृथ्वीतत्त्वाची केंद्रे असे म्हटले जाते. याचा अर्थ पृथ्वीच्या पोटामध्ये जेथे डांबर, लोखंड, सोने, हिरे, तांबे असे धातु निर्माण होतात तेथे रहाणाऱ्या महाभयंकर राक्षसी आत्म्यांपासून पृथ्वीला चिकटलेली earthbound spirits तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जेथपर्यंत आहे तेथपर्यंत असणाऱ्या सर्व शक्तींना पृथ्वीतत्त्वातील शक्ती असे म्हणतात. थोड्याफार साधना करून या शक्तींना वश करता येते व या शक्तींच्या आधारे चमत्कार दाखवून पृथ्वीवरील माणसांवर हुकुमत गाजविता येते, इतकेच नव्हे तर पृथ्वीवर राज्यही करता येते. परंतु याचा अर्थ असा नव्हे की अशा साधकाने spiritual progress केलेला आहे. मृत्युनंतर असे साधक या पृथ्वीलोकातील आत्म्यांचे गुलाम बनतात व हजारो वर्षे ही गुलामी चालत रहाते. यदाकदाचित् साधना करतांना काही चूक झाल्यास साधकाला वेड लागण्याची शक्यता असते, किंवा इतरही काही भयंकर शिक्षांना तोंड द्यावे लागते.
सामुहिक प्रारब्धाचा (Collective Fate) परिणाम म्हणून पृथ्वीतलावर प्रचंड चक्रीवादळे निर्माण होऊन भयंकर नुकसान होते. काही वादळांमध्ये २५० कि.मी वेगाने वारे वाहतात, सुनामी येते, खूप मोठमोठे भूकंप होतात हे सर्व उत्पात पृथ्वीतत्वात राहणाऱ्या प्रचंड आकाराच्या राक्षसी शक्ती घडवून आणत असतात.
या शक्ती गावेच्या गावे व शहरेच्या शहरे उद्ध्वस्त करतात. सामुहिक प्रारब्धानुसार (collective fate) युद्ध करण्याची, कपट कारस्थान करून दोन देशांमध्ये युद्ध घडवून आणण्याची, विमान अपघात घडवून आणण्याची, बोटी बुडवण्याची कामे करतात. थोडक्यात या शक्ती माणसाला दुर्बुद्धी देतात. दुर्बुद्धी प्रधान माणसाला एकत्र आणतात व त्यांच्या द्वारे विध्वंसक, विनाशक कार्ये केली जातात. अशा प्रकारे सर्व दुष्ट कामे या शक्ती करतात.