श्वासाची साधना व ईश्वरभक्ती आणि परोपकार (charity) या गोष्टींची अनेक वर्षे कास धरून सात्त्विकता परिपूर्णतेने अंगी बाणल्यास, हृदयामध्ये आनंदाचा झरा वाहू लागतो. अशा साधकाला पाहिल्यानंतर खऱ्या सद्भक्तांना आनंद होतो पण त्याचबरोबर स्वार्थी लोक अशा साधकाचा दुरुपयोग करू लागतात. अशावेळी साधकाचा सूक्ष्मदेह जर पूर्णपणे शुद्ध असेल तर अदृश्य सृष्टीतील महान संत, महान आत्मे, देव-देवता, guardian spirit यापैकी कोणीतरी प्रकट होऊन, अशावेळी कसे वागावे याचे मार्गदर्शन करतात. अशावेळी बाकी कसलाही विचार न करता अदृश्यसृष्टीतून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार वागावे लागते. अन्यथा साधकाचे नुकसान होण्याची खूप शक्यता असते.
यावरून एक गोष्ट लक्षात येईल की आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी सूक्ष्मदेहाची परिपूर्ण शुद्धी होणे अतिशय जरुरी असते व सूक्ष्मदेहाची परिपूर्ण शुद्धी झाल्यानंतर अदृश्यसृष्टीतून जे काही मार्गदर्शन मिळते त्या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करावे लागते. अदृश्यसृष्टीतून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे व्यवस्थित आदरपूर्वक पालन झाले नाही तर खूप मोठ्या शिक्षा भोगावयास लागतात व जोपर्यंत सूक्ष्मदेहाचे परिपूर्णरितीने शुद्धीकरण झाले नाही तोपर्यंत अदृश्यसृष्टीतून मार्गदर्शन होत नाही.
सज्जन व्यक्तिमध्ये व तीर्थक्षेत्रांमध्ये दोष पाहणारा मनुष्य कधीही सुखी होऊ शकत नाही, याची सतत जाणीव ठेवत राहावी. सतत सात्त्विक विचार करत राहावे. इतरांना आनंद देण्याचे विचार करावे, कोणाचाही ईर्षा, द्वेष, मत्सर करू नये. कोणावरही जळू नये. कुठलाही प्रकारचा लोभ किंवा स्वार्थ करू नये. माझ्यापेक्षा दुसरा जास्त सुखी का आहे, असा विचार मनात आणू नये. अशा प्रकारे मनाला शिस्त लावली असता, रजोगुण, तमोगुण कमी होतात व सत्त्वगुणाची वाढ होते.
मी का जन्माला आलो? कोठून जन्माला आलो? जन्माला येण्यापूर्वी मी कोठे होतो? शरीराच्या मृत्युनंतर मी जाणार कोठे? असा विचार दिवसातून अनेक वेळा करावा, याने मनाला अनेक प्रकारचे बोध प्राप्त होतात.
दररोज आपण माझे हात, माझे पाय, माझे डोळे, माझे नाक, असे म्हणतो. Indirectly मी म्हणजे हात नव्हे, मी म्हणजे पाय नव्हे, मी म्हणजे डोळे नव्हे, मी म्हणजे नाक नव्हे असे म्हणत असतो. पण मी म्हणजे कोण? याचा शोध आपण कधीही करत नाही. मी कोण आहे? याचा शोध घेणे म्हणजे spirituality ची सुरुवात व मी कोण आहे हे समजणे म्हणजे self-realisation.