Articles

सूक्ष्मदेहातील पंचभूतात्मक शक्ती

साधनेची प्रक्रिया अशी आहे की सूक्ष्मशरीर स्फटिकाप्रमाणे शुद्ध करणे व स्वच्छ करणे. ही गोष्ट शुद्ध भावनेने सोऽहम् साधना अनेक वर्षे केल्यानंतर साध्य होते.

पुष्कळवेळा असे घडते की ५० वर्षे ईश्वरभक्ती किंवा श्वासाची साधना करूनही साधकाचा आत्मा शुद्ध होत नाही. त्याच्या अंगी पवित्रता येत नाही, आचार शुद्धी व विचार शुद्धी त्याला प्राप्त होत नाही. असे साधक काहीतरी शक्ती मिळविण्यासाठी मंत्र-तंत्राच्या साधना करतात. असे साधक मृत्युनंतर पृथ्वीतलावर भूत-पिशाच्च (earth bound spirits) होऊन राहतात, म्हणून सूक्ष्मदेह शुद्ध केल्याशिवाय कधीही साधना करू नये. सूक्ष्मदेह शुद्ध होण्यासाठी अखंड नामस्मरण, ईश्वरी महिमा वर्णन करणाऱ्या स्तोत्राची आवर्तने करावीत व ग्रंथाचे वाचन व श्वास साधना करत राहावी. शक्य झाल्यास परोपकार व दान (charity) करत राहावे.

सूक्ष्मदेहातील शक्ती

सूक्ष्मदेहाच्या पायाच्या तळव्यापासून गुडघ्यापर्यंतच्या भागामध्ये पृथ्वी तत्त्वातील कोट्यावधी शक्तिंची केंद्रे असतात. यातील एखादे जरी केंद्र जागृत झाले तरी पिशाच्च सृष्टीतील आत्मे साधकाशी बोलू लागतात. पुष्कळवेळा हे भूत-भविष्यही सांगतात, चमत्कार करून दाखवतात, परंतु हा मार्ग अतिशय धोकादायक असतो कारण असे साधक मृत्युनंतर भूत-पिशाच्च (earth bound spirits) होतात किंवा दुसऱ्या एखाद्या मांत्रिक-तांत्रिकांचे (exorcist/occultist) गुलाम होतात व हे पारतंत्र्य शेकडो वर्षे भोगावे लागते.

सूक्ष्मदेहाच्या गुडघ्यापासून ओटीपोटाच्या भागापर्यंत, आप तत्त्वातील लक्षावधी केंद्रे (millions of power centers) असतात. यातील काही केंद्रे जरी जागृत झाली तरी साधकाला चमत्कार करण्याच्या शक्ती प्राप्त होतात, जादूची विद्या प्राप्त होते. हवेतून विविध पदार्थ काढता येतात. तरीही अशा शक्तिंच्या नादी लागू नये. या शक्तिही लोकांना खूप फसवतात.

तळव्यापासून मांड्यांपर्यंतच्या भागाला शक्तिंचा प्रांत किंवा काळामार्ग (black path), अधोमार्ग, असे म्हणतात. या मार्गाने जाणारे लोक मृत्युनंतर अंध:कारमय लोकात जातात.

मांड्यांपासून ओटीपोटापर्यंतच्या भागामध्येही असंख्य शक्ती आहेत. याला मध्यमार्ग किंवा अरोरा मार्ग, उषा देवता मार्ग असे म्हणतात. येथून प्रकाशमार्गाची सुरुवात होते. येथे अर्ध देवता किंवा ३/४ stage च्या देवता राहतात.

सूक्ष्मदेहाच्या नाभीपासून हृदयापर्यंतच्या भागामध्ये तेज तत्त्वातील असंख्य देवता राहातात. ओटीपोटापासूनच प्रकाशमार्ग सुरू होतो. येथपर्यंत प्रवास करणाऱ्या साधकाची कधीही अधोगती होत नाही, म्हणून साधकांनी साधना करताना तेज तत्त्वापासून साधना सुरू करावी. पृथ्वीतत्त्व व आपतत्त्वाची साधना करू नये.

साधक तेजतत्त्वात स्थिर झाल्यानंतर त्याची सतत प्रगती होत राहते. अनेक देव देवतांची दर्शने होत राहतात. सिद्धयोग्यांकडून पुढील मार्गदर्शन मिळू लागते. मृत्युनंतर देवलोकात प्रवेश प्राप्त होतो.

सूक्ष्मदेहाच्या छातीपासून कंठापर्यंतच्या भागामध्ये वायू तत्त्वातील असंख्य केंद्रे असतात. येथे विविध प्रकारचे ज्ञान होते. ज्ञानमार्ग किंवा विहंगम मार्ग येथून सुरू होतो.

येथे साधक योगी होतो. त्याच्या योगमार्गातील साधना सुरू होतात. अदृश्यसृष्टीतील अनेक योग्यांची दर्शने होतात. तो श्वासाला आज्ञाचक्राकडे नेण्याचा प्रयत्न करू लागतो. येथपर्यंत साधकाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही देवदेवतांची उपासना करण्याची आवश्यकता राहत नाही. इतकेच नव्हे तर स्थूलदेहाद्वारे साधना करण्याची आवश्यकता राहत नाही. योग्याच्या सर्व साधना सूक्ष्मदेहामध्ये चोवीस तास सुरूच राहतात. याला सूक्ष्मदेहाने साधना करणे असे म्हणतात. येथे योग्याचे मन १०० टक्के निर्विचार होते, समाधी लागते. असंख्य देवदेवतांची, सिद्धयोग्यांची कृपा प्राप्त होते.

सूक्ष्मदेहाच्या कंठापासून भ्रूमध्यापर्यंतच्या भागामध्ये आकाशतत्त्वातील लक्षावधी केंद्रे असतात. येथे परमेश्वरस्वरूप असंख्य महायोग्यांची दर्शने होतात. योग्याचा कारणदेहात प्रवेश होतो. येथे त्याला निर्विकल्प समाधी लागते, सर्वज्ञता प्राप्त होते. काही जाणावयाचे शिल्लक राहत नाही.

परमेश्वराशी एकरूप झाल्यावरसुद्धा योग्याचा आध्यात्मिक प्रवास पुढे सुरूच राहतो. आज्ञाचक्रापासून सोमचक्रापर्यंतच्या (fontanel) प्रांतामध्ये योग्याचा महाकारणदेहात प्रवेश होतो. महाकारणदेहात प्रवेश झाल्याबरोबर योग्याचा अत्यंत पवित्र असा सूक्ष्मदेह व कारणदेह यांचे अस्तित्व नष्ट होते व परमेश्वरस्वरूप महाकारणदेहाद्वारे तपस्या सुरू राहते. या प्रवासाला शून्य प्रांतातील साधना असे म्हणतात.

सोमचक्रापासून सहस्त्रारचक्रापर्यंतच्या प्रांताला महाशून्याचा प्रांत असे म्हणतात. येथे योग्याचे स्वत:चे अस्तित्व नष्ट होते. आध्यात्मिक प्रवास संपतो, योगी महायोगी होतो. परब्रह्म होतो. Supreme Absolute होतो.