संस्कृत अक्षरांमध्ये प्रचंड दैवी शक्ती व रहस्यमय ज्ञान भरलेले असते. मानवी देहामध्ये तेजस्वी प्रकाशामध्ये ही अक्षरे योग्यांना साक्षात् दिसतात व या प्रत्येक अक्षरामध्ये असणाऱ्या शक्तीचे ज्ञान होते. यामुळेच संस्कृतला देवनागरी लिपी असे म्हटले जाते. देवनागरी या शब्दाचा अर्थ देवतांचे ज्ञान देणारी लिपी.
या अक्षरांचे शरीरात योग्य जागी ध्यान केल्याने म्हणजे शरीरामध्ये जेथे हे अक्षर असते तेथे त्याचे ध्यान केल्याने त्या अक्षराला तेथे पाहिल्याने त्या अक्षरात असणारी सारी शक्ती साधकाला प्राप्त होते. हा विषय अत्यंत रहस्यमय असल्याकारणाने या विषयावर फार बोलणे शक्य होणार नाही. फक्त एक उदाहरण देऊन हा विषय थांबवतो.
मांडी घालून बसल्यानंतर मांड्यांचा जो आकार तयार होतो, तो आकार संस्कृत देवनागरी लिपीतील ‘लं’ आहे. या ‘लं’ चे ध्यान केले असता शरीरातील पाच तत्त्वांपैकी पृथ्वीतत्त्वाचे ज्ञान होते. म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये काय दडले आहे याचे ज्ञान होते तसेच पृथ्वीच्या वातावरणामध्ये जी अदृश्यसृष्टी आहे त्या अदृश्यसृष्टीतील आत्म्यांचे ज्ञान होते. अदृश्यसृष्टीतील देवता, अरण्यात राहणाऱ्या देवता आत्मे यांचे ज्ञान होते. पर्वतांमध्ये गुप्तरुपाने तपस्या करणाऱ्या ऋषींचे ज्ञान होते. भूगर्भामध्ये पाण्याचे प्रवाह कोठे आहेत ते कळतात. जमिनीत गाडून ठेवलेल्या खजिन्याचा पत्ता लागतो. प्राणी व पशू यांच्या भाषा समजू लागतात. रसायन शास्त्राचे ज्ञान होते. अशाप्रकारे साधकाला पृथ्वीतत्त्वाची साधना केल्यानंतर पृथ्वीतत्त्वाअंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींचे म्हणजे खनिज द्रव्य, वातावरणातील आत्मे, वनस्पतिंचे रसायनशास्त्र, पाऱ्याचा (mercury) उपयोग, पशुपक्षी भाषा ज्ञान, सर्पांशी बोलणे अशा सर्व गोष्टींचे ज्ञान होते. याशिवाय पर्वतात राहणारे ऋषीमुनी व अदृश्यसृष्टीतील आत्म्यांशी परिचय होतो. या सर्व गोष्टी ‘लं’ या एका बीजाक्षराच्या ध्यानाने प्राप्त होतात. साधकाच्या सूक्ष्म देहाचा रंग सोन्यासारखा (golden) होतो व पृथ्वीतत्वावर विजय प्राप्त होतो. गुरुत्वाकर्षणशक्तीवर विजय प्राप्त होतो. मूलाधारचक्र जागृत होते.
संस्कृतमधील देवनागरी लिपीमध्ये किती अद्भुत सामर्थ्य आहे याची किंचितशी झलक येथे दाखविली आहे.
साधक पृथ्वीतत्त्वावर विजय प्राप्त केल्यानंतर आपतत्त्व, तेजतत्त्व, वायुतत्त्व व आकाशतत्त्व अशा सर्व तत्त्वांवर विजय प्राप्त करतात व शेवटी परमतत्त्वाशी म्हणजे Supreme Absolute शी तादात्म्य पावतात.