परिचय

श्री स्वामी दत्तगिरी उर्फ स्वामी दत्तावधूत हिमालयातील एक अतिशय ज्येष्ठ योगी आहेत. बालपणापासूनच ते उग्र तपस्येत मग्न असायचे. श्रीस्वामीजींनी हिमालयात राहून खूप तपस्या केली. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक दिव्य अनुभव आले, अलौकिक व दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी संपूर्ण देश पायी प्रवास करत, कृष्णा, नर्मदा व तुंगभद्रा या नद्यांची प्रदक्षिणा केली व अनेक दिव्य अनुभव प्राप्त केले.

 

या प्रवासात लाखो लोकांना त्यांच्या दर्शनाचा व मार्गदर्शनाचा लाभ झाला. श्रीस्वामीजींना, अक्कलकोट स्वामी अर्थात स्वामी समर्थांनी दर्शन देऊन पोथी व ग्रंथ लेखन करावयास सांगितले जेणेकरून वाचकांना किंवा साधकांना या दिव्य ज्ञानाचा लाभ होऊन त्यांना आध्यात्मिक जीवन जगता येईल.

जन्म व ‘मृत्यू’

श्री स्वामी दत्तावधूत यांचा जन्म २४ सप्टेंबर १९५३ रोजी रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे झाला.

 

एक दीड महिन्यातच, १-२ दिवसांच्या आजारपणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली, इतक्यात तेथे एक साधू प्रकट झाले, व त्यांनी श्रीस्वामीजींना जिवंत केले.

 

श्रीस्वामीजींना जिवंत केल्यानंतर ते साधू अचानक नाहीसे झाले. तेथे जमलेले सुमारे १००/१५० लोकांना या साधूंबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांच्या पाया पडून त्यांना काहीतरी द्यावे असे श्रीस्वामीजींच्या वडीलांना वाटले पण ते साधू कोठेही दिसले नाहीत. त्याकाळी म्हणजे १९५३ साली, श्रीस्वामीजींच्या घराच्या आसपास चारही दिशेला एकही घर नव्हते. सुमारे अर्धा किलोमिटर दूर अंतरावर एक छोटेसे मंदिर होते, तेथे जाऊन त्या जीवनदान देणाऱ्या महात्म्याचा शोध घेण्यात आला, परंतु तो तेथेही नव्हता.

दिव्य घटना

श्रीस्वामीजींचा जन्म होण्यापूर्वीपासूनच त्यांच्या घरी नेहमी सत्पुरुष येत असत. श्रीस्वामीजी दोन वर्षांचे असताना एक सिद्धपुरुष आले. या सिद्धपुरुषाकडे एक मातीचे मडके होते. या मातीच्या मडक्यातून ते विविध प्रकारचे पदार्थ काढून स्वामीजींच्या भावंडांना खायला देत असत. रात्री झोपताना ते मडके दोन्ही हातांनी दाबून त्याची उशी तयार करीत व डोक्याखाली घेऊन झोपत.

 

या सिद्धपुरुषाने श्रीस्वामीजींच्या वडीलांना सांगितले होते की, ”तुझा हा मुलगा हिमालयातील एक खूप मोठा योगी असून फक्त जगाच्या उद्धाराकरिता जन्माला आला आहे. स्वत:ची प्रसिद्धी होऊ न देता तो शांतपणे लाखो लोकांचा उद्धार करेल व जसा आला तसा निघून जाईल. तो गेल्यानंतर २५-३० वर्षांनी त्याचे नांव जगभर प्रसिद्ध होऊ लागेल.”

 

श्रीस्वामीजी जेव्हा दोन वर्षांचे होते तेव्हापासून ते अखंड ‘दिगंबरा दिगंबरा’ असे नामस्मरण करत असत तेव्हापासून आजपर्यंत त्यांची दत्तभक्ती चालूच आहे.

दत्तमूर्तीचे आगमन

श्रीस्वामीजी ५-६ वर्षांचे असताना त्यांच्या घरी एक सत्पुरुष आले व त्यांनी श्रीस्वामीजींना चांदीची दत्तमूर्ती भेट दिली व दररोज दोन-दोन तास दत्ताचा जप करण्यास सांगितले. त्या सत्पुरुषाने… “हा मुलगा एक सिद्धपुरुष असून हा लोकांचे प्रश्न सोडवेल. लोकांची दुःखे दूर करेल, लोकांच्या व्याधींचे हरण करेल,” असे उपस्थित लोकांना सांगितले व श्रीस्वामीजींना सांगितले, ”तू विभूती, माती, झाडांची पाने किंवा नुसता आशीर्वाद दे, लोकांची कामे होतील.” तेव्हापासून आजपर्यंत गेली साठ वर्षांहून अधिक काळ त्यांचे लोकोद्धाराचे कार्य सुरू आहे.

 

“वयाच्या १२व्या वर्षी श्रीस्वामीजींनी घर सोडले व हिमालयापासून निलगिरीपर्वतापर्यंत व माऊंटअबू, गिरनारपासून निलांचलपर्वतापर्यंत विविध ठिकाणी साधना, तपस्या केल्या, अनेक देव-देवतांची प्रसन्नता प्राप्त केली. लोकांचे कल्याण व्हावे म्हणून असंख्य ठिकाणी शक्ती ठेवल्या. अनेक महायोग्यांची दर्शने घेतली व त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले.

 

श्रीस्वामीजींच्या प्रवासी जीवनामध्ये त्यांच्याकडे जो कोणी आपली समस्या घेऊन येत असे, त्या प्रत्येकाच्या समस्यांचे निवारण होत असे. त्यांच्या दर्शनासाठी सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत लोक येत असत.

 

या काळामध्ये श्रीस्वामीजी परमेश्वराची पुढील प्रमाणे प्रार्थना करत:

“हे परमेश्वरा माझ्याकडे दररोज शेकडो लोक येतात, तुझ्या कृपेने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. हे जरी खरे असले तरी माझ्या नाशीवंत देहाला अकारण महत्त्व प्राप्त होते. मी फक्त पंधरा-सोळा वर्षांचा आहे. मी फक्त विद्यार्थी आहे व हे लोक मला बालयोगी समजतात. याशिवाय माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला चहा-पाणी नाश्ता, जेवण द्यावे अशी माझी खूप इच्छा असते व माझ्याकडे काहीच नाही. लोकांनाही खूप दूरुन माझ्याकडे येण्याचे कष्ट घ्यावे लागतात व मलाही तपस्या करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. याशिवाय फक्त लोकांची कामे होणे, म्हणजे ईश्वरी कार्य नव्हे. ईश्वरी कार्य म्हणजे आत्म्याला मनुष्याचा जन्म का प्राप्त झाला याचे ज्ञान समाजाला होणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी तू मला काहीतरी मार्ग दाखव जेणेकरून या सर्व गोष्टी मला एकत्रित साध्य होतील.”

अनेक दिवस अशी प्रार्थना केल्यानंतर एके रात्री अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले व म्हणाले:

 

“तू पोथ्या व पुस्तके लिही, त्यामध्ये अत्यंत दिव्य सामर्थ्य असेल, पोथ्या लोकांच्या मनोकामना पूर्ण करतील, आधी-व्याधी नष्ट करतील, संकटे दूर करतील व पुस्तके लोकांना आध्यात्माचे ज्ञान देतील.”

 

आज सुमारे दहा लाखाहून अधिक घरांमध्ये श्रीस्वामीजींनी लिहिलेल्या पोथ्या व पुस्तके वाचली जात आहेत.

 

श्रीस्वामीजींनी जे काही कार्य केले, या त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारी तीन पुस्तके- ईश्वरभक्तीचे अनुभव (श्रीस्वामीजींनी लिहिलेली पुस्तके व पोथ्या वाचून लोकांना आलेले विविध अनुभव), सिद्धोग्याच्या सहवासात भाग १ व २ (श्रीस्वामीजींच्या सहवासात ॐवनिताॐ यांना आलेले दिव्य अनुभव), ॐवनिताॐ यांनी लिहीली आहेत.

 

पोथ्या व पुस्तके वाचणाऱ्या हजारो लोकांच्या गाठीभेटी घेऊन, त्यांचे अनुभव ऐकून, ऐकलेल्या शेकडो अनुभवांपैकी काही अत्यंत महत्त्वाचे अनुभव त्यांनी पुस्तकात घेतले आहेत. याशिवाय असे शेकडो अनुभव लोकांना आले आहेत, ज्यांचे वर्णन पुस्तकात केलेले नाहीत.

 

आपणासर्वांना सुद्धा श्रीस्वामीजींनी लिहिलेल्या या अमूल्य ग्रंथांपासून लाभ व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना!